Saturday, April 23, 2022

#muknayak



#muknayak

भारतरत्न डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरू : तथागत गौतम बुद्ध, महात्मा कबीर आणि महात्मा जोतिराव फुले


            डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक युगप्रवर्तक महापुरुष होते. त्यांनी तथागत गौतम बुद्ध, महात्मा कबीर आणि महात्मा जोतिराव फुले या तिन्ही महापुरुषांना आपले गुरू मानले होते. त्या अर्थी त्या तिघातही विचारसरणीच्या दृष्टीने काही साम्य, काही समानसूत्र असले पाहिजे, जे डॉ. आंबेडकरांतही सामायिक असेल. या दृष्टीने विचार करता आपल्या, लक्षात येईल की, या सर्वांना एकत्र बांधणारा एकमेव धागा म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद (Rationalism) होय. यावरून कार्यकारण परंपरा प्रमाण मानणारे बुद्धिवादी विचारवंत म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय. त्यानुषंगाने मानवाला सहजपणे जीवन जगणे नाकारणाऱ्या अनिष्ट रूढी, मानवी हक्क नाकारणार्‍या अंधश्रद्धा व आंधळेपणा त्यांना मान्य नव्हता. तथागत गौतम बुद्धांनी या धर्तीवरील समस्त लोकांनी, मानवांनी एकमेकांशी बंधूभावनेने वागले पाहिजे यासाठी मानवतेचा संदेश दिला. प्रत्येकाला मिळालेले जीवन हे नश्वर आहे, त्यामुळे येथे आपण एकमेकांसाठी जे कार्य करू ते कार्यच अमर राहील. त्यामुळे कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी दया, क्षमा, शील, करुणा दाखवून प्रेमाने, आदराने वागावे. तसेच सर्व मानवजातीचे कल्याण करणाऱ्या दया, क्षमा, शील, करुणा यांचा अंगीकार करण्याचा त्यांनी संदेश दिला. त्यासाठी त्यांनी अष्टांग मार्ग सुचवला. अहिंसा करूनच जीवनाचे मार्गक्रमण केले पाहिजे हे विश्वबंधुत्वाचे तत्त्व त्यांनी रुजविले. तर महात्मा कबीर यांनी अस्पृश्यतेला विरोध करून मानवता धर्म प्रस्थापित करण्यासाठी आपल्या भजनातून, दोह्यातून जनजागृती केली. सर्व मानव एक असून सर्वांशी बंधूभावनेने वागले पाहिजे असे त्यांनी पटवून दिले आणि समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, कर्मकांड, अंधश्रद्धा यांचा विरोध करून निंदा केली. मानवताधर्म रुजविण्यासाठी दया, क्षमा आवश्यक आहे हे सांगताना ते म्हणतात, 

जहा दया तहाॅं धर्म है, 
जहाॅं लोभ वहाॅं पाप
जहाँ क्रोध तहाँ काल है, 
जहाँ क्षमा वहाँ आप 

प्रत्येकाने इतरांचे दुःख हेच आपले दुःख समजून इतरांना मदत केली पाहिजे व इतरांच्या कामी आले पाहिजे. हे मानवतावादी तत्त्व कबिरांनी सांगितले. तर आधुनिक काळातील महान समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांनी सुद्धा समाजात मानवता धर्म रुजविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. महात्मा फुले यांच्या विचारांवर आणि लेखनावर मानवतावादी विचारवंत थॉमस पेन यांच्या मानवाचे हक्क (Human Rights) या पुस्तकाचा फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी, अंधश्रद्धा यांनी ग्रासलेल्या समाजातील अत्याचार, अन्याय नष्ट करण्यासाठी व मानवता धर्म रुजवण्यासाठी महात्मा फुले यांनी सर्व स्त्री-पुरुष समान असून सर्वांना समान हक्क असल्याचे प्रतिपादन केले. त्यासाठी लोकांमध्ये, स्त्रियांमध्ये आपल्या हक्कांविषयी जागृती होण्यासाठी शिक्षणाचा मार्ग सुचवला. इसवी सन १८४८ मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात स्वतः मुलींची पहिली शाळा काढून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आणि स्री-पुरुष समतेचा झेंडा रोवला. तथागत गौतम बुद्ध, महात्मा कबीर आणि महात्मा फुले यांनी आपल्या कार्यातून, विचारातून व प्रबोधनातून समाजात मानवताधर्म, बंधुभाव रुजवण्यासाठी व विश्वकुटुंबवाद रुजविण्यासाठी प्रयत्न केले. हाच वारसा चालवत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्ध, महात्मा कबीर व महात्मा जोतिराव फुले यांनी समाजात रुजविलेला मानवताधर्म, विश्वकुटुंबवादाचे तत्त्व मानवात रुजवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. आपल्या गुरूच्या कार्याला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांना संधी मिळाली तेव्हा, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित भारतीय संविधानाचे शिल्प साकारून देशातील सर्व मानव स्त्री-पुरुषांना समान ठरविणारा व समान हक्क प्रदान करणारा कायदा प्रत्यक्षात आणला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि समान न्याय प्रस्थापित झाल्याने सर्व स्त्री-पुरुषांना समान अधिकार हक्क प्राप्त झाले. म्हणून समाजात समानता प्रस्थापित होऊन विश्वकुटुंबवाद व मानवता धर्म रुजण्यास मदत झाली. यात तथागत गौतम बुद्ध, महात्मा कबीर आणि महात्मा जोतिराव फुले यांना आपल्या गुरू स्थानी मानून त्यांच्या मानवतावादी विचारांचा वारसा चालवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोलाचे योगदान आहे. या सर्व महान विभुतींना माझे त्रिवार वंदन.


डॉ. निलेशकुमार रामभाऊजी इंगोले
सहायक शिक्षक
जिल्हा परिषद शाळा बऱ्हाणपूर
पं. स. मोर्शी, जि. प. अमरावती 
UDISE 27071102901
संपर्क - 9371145195

1 comment: